Thursday, 6 December 2018

घंटा !!

८ डिसेंबर २०१८ रोजी असणाऱ्या शाळेच्या २००२ बॅचच्या गेटटुगेदर निमित्ताने सुचलेले..

दुसरी घंटा झाली की घरातून निघायचे. होय... घर शाळेच्या अगदीच जवळ असल्याने शाळेची घंटा घरी ऐकू येत असे.. त्यामुळे दहा वर्ष हाच शिरस्ता..


इथून दिवसाची सुरुवात व्हायची..


चुकून लेट झालाच तर मग आता प्रिफेक्ट्स पकडतील असा विचार मगन चे दुकान येईपर्यंत मनात आलेला असायचा..


पहिला तास मूल्य शिक्षणाचा..

घंटा वाजली की सगळे सावधपणे (क्लास टीचर आता येतील या कडे लक्ष) मस्तीत मश्गूल..

असेच तासा मागून तास जायचे, मग पाचवा तास आला की मधल्या सुट्टीचे वेध..


बस.. घंटा वाजली की एकच कल्ला..!!

पटापट डबा खाऊन खाली अंगणात प्लास्टिक फुटबॉल खेळायला जायचे..
अंगणातली या टोकापासून त्या टोकापर्यंत इतकी मोठी गोल पोस्ट!!

पुन्हा घंटा व्हायची.. पहिली घंटा,  दुसरी घंटा.. आणि तिसरी.. त्या नंतर कुठे टाईम आऊट व्हायचा..


पुन्हा तास सुरू.. पुन्हा अभ्यास सुरू..

यातच पी. टी. चा आणि चित्रकलेचा तास म्हणजे धम्माल !!
गच्ची फुटबॉल चा शोध पण इथेच लागला...!!
पुन्हा घंटा व्हायची पुन्हा मन रेंगाळत वर्गात जायचं...

संध्याकाळी शाळा सुटायची शेवटची घंटा.. पुन्हा एकदा एकच कल्ला..!!

कधी कधी शिक्षक तेव्हा पवित्रा घ्यायचे.. एवढा धडा संपवून घेऊ, अजून १० मिनिट थांबा.

घरी जाताना हरी कडे चिंचा गोळ्या घेऊन जायचे...


मागे असलेल्या माती कामाच्या पिंजऱ्यात सुरू झालेली जडण घडण कुंभाराच्या मडक्या प्रमाणे होत गेली... प्रयोगशाळा, वागळे हॉल, लायब्ररी या सर्वच गोष्टी म्हणजे कुंभाराचे चाकच जणू...


शाळा सुटली.. कॉलेज सुरू झाले.. मग नोकरी आणि व्यवसाय...

मग जाणवते की शाळाचं बरी होती...आणि आठवते ती शाळेच्या घंटे ने शिकवलेली वेळेची शिस्त..

आता अलार्म क्लॉक आणि आऊटलुक कॅलेंडर वर धावणारे.. धावणारे कसले जीव ओढत पळणारे लाईफ.. या सर्वात आपल्या शाळेच्या घंटे ची आठवण आल्याशिवाय राहत नाही..


आणि हो.. शाळा म्हटली की शिक्षकांची आठवण आलीच.. पण शाळेची घंटा म्हटली की नवरे काका, गायकवाड काका, जावळे काका,  बेटकर काका आणि समस्त शिपाई काकांना कसे बरे विसरून चालेल ??


🙏 शीलं परं भूषणम् 🙏

No comments:

Post a Comment