Monday, 15 October 2012

काक मेळावा: सर्वपित्री अमावस्या!

संध्याकाळची वेळ, दिवस सरतोय तसे कॉलनीमधले जुनाट पिंपळावर कावळ्यांचा पितृ वार्षिक संमेलन भरण्याची तयारी चालू होती. आजचा दिवस म्हणजे, कावळ्यांचा सन्मान करायचा ... ज्या आई वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्रास दिला त्यांची पूजा करायचा.... हेतु ? फक्त स्वार्थभाव ... अर्थात पितरांचा आपल्याला त्रास होऊ न देणे.


सगळे पूर्वज जमले होते सभेला, पोट मात्र गच्च भरले होते. आपल्या मुलांना - नातवांना पाहून, त्यांचा संसार पाहून आले होते सगळे. मेळावा सुरु झाला, काव...काव.. काव.. एकच कल्ला! सर्व खुश होते तर त्यातला एक अस्वस्थ बसला होता.

सगळ्यांनी त्याला विचारले, का रे बाबा काय झाले तुला ? तू का इतका दु:खी ? तर तो कावळा ढसा ढसा रडू लागला तसा पिंपळाचा पार अचानक शांत झाला.

तो बोलू लागला.. माझ्या नातवाने मला नैवेद्य दाखवला, त्याला पाहून बरे वाटले पण त्याचे संभाषण ऐकून फार वाईट वाटले; मागून त्याची आई ओरडत आली, " अरे पिंट्या जेवण गार होतंय सिलेंडर महाग झालेत! परवडत नाही, किती वेळ फोन वर बोलतोयस ? म्हणे नेट फ्रेंड ! आग लाव त्या फेसबुक ला... कॉम्पुटर बंद कर आधी आणि जेवायला ये. पिंट्या चरफडत जेवायला आला. कावळोजीराव पुढे सांगत होते, म्हणे नातवाला डॉक्टर बनायचे आहे, पण शिक्षणाला पैसे कुठून आणणार? आपल्या काळात खूप स्वस्ताई होती.. आता तर हाहाकार माजलाय! मुलाच्या नोकरीत घर चालत नाही, मोठी नात लग्नाची आहे.. तिच्या लग्नासाठी कर्ज काढले तर नातू डॉक्टर नाही बनणार, माझा मुलगा सारखा चिंतेत असतो आणि माझी सून संसाराचा गाडा कशी चालवते तिचे तिलाच माहित.

आता मात्र सगळेच शांत झाले. काय करणार ? खरे तर सगळ्याच घरात तीच परिस्थिती होती.

तसा दुसरा कावळा बोलू लागला, अहो काय सांगू राव... आम्ही एकत्र कुटुंब ७ जण १५ X १० च्या खोलीत आनंदात राहायचो, आता मुलांची लग्न झाली, खाणारी तोंड वाढली आणि त्यावर राहायला जागा पण नाही. तेंव्हाच थोडे धाडस करून जागा घेऊन ठेवली असती तर चीज झाले असते, आता तर पै पै साठवून घर घेण्यासाठी धडपड करावी लागतेय, स्वताला विकले तरी आता घर परवडणार नाही. अशा परीस्थितत मुलगा लग्नाचा असला तर अजूनच चिंता! मुलींच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यात, लग्नासाठी दागिने करायचे म्हणजे सोनं जमवायला पाहिजे, ते तर आता शक्य नाही, आधीपासूनच सोनं जमवून ठेवायला पाहिजे होत. मोठा नातू, त्याचे लग्न झालेय मला पणतू सुद्धा आहे, पण गेल्या आठवड्यात त्याला कामावरून नोटीस आलीये, दुसरी नोकरी शोधण्यासाठी, आता सांगा राव, इतकी वर्ष नोकरी करून सिनियर मेनेजर पदावर असलेल्या मुलाला अचानक अशी नोटीस आली तर काय करायचे हो ? त्याचा संसार हा संसार नाही का?

तिसरा कावळा म्हणाला: माझा मुलगा तर डॉक्टर आहे, त्याचे सर्व आलबेल आहे, पण त्याच्या कडे येणारे पेशंट पाहता डोक चक्रावून जाईल, त्यांना गरोदर पेशंट म्हणावे की मेंटल पेशंट काही कळत नाही. मुलगी होणार की मुलगा ते पहायचे असते त्यांना, म्हणे समाजात नाचक्की होते मुलगी झाली तर ! काय म्हणावे अशांना कळत नाही.

तितक्यात एक सुज्ञ कावळा पुढे आला, कदाचित समाज प्रबोधन चळवळीतील माजी कार्यकर्ता असावा तो, तो बोलू लागला, " मित्र हो, आपलेच चुकले का कदाचित? या सर्व गोष्टी काही अचानक नाही निर्माण झाल्या, आपल्या पिढी पासूनच या गोष्टी मोठ्या झाल्या, आपणच खत पाणी घातले या सगळ्याला."

यावर एक कावळा म्हणाला असे कसे शक्य आहे ? आम्ही तर या सगळ्याच्या विरोधात होतो.. आमच्या पण घरी हेच सर्व आम्ही पण भोगले होते!

सुज्ञ कावळा: अहो तेच तर म्हणतोय... आपण फक्त भोगले, त्यचा प्रतिकार केला का ? फक्त राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडली, त्या पलीकडे काय केले ? आज हेच सर्व अराजक बनून डोक्यावर नाचतायत. आपण तर सुटलो, आपल्यात कितीतरी कर्जबाजारी शेतकरी बंधू असतील, घर खर्च भागत नाही असेही काही निराश असतील, पण आपल्या कुटुंबीयांनी काय करायचे, की त्यांनी पण जीवन संपवायचे?

पूर्वी आपल्या चालण्यासाठी आधाराच्या काठीला सोन्याची मुठ असायची, आता दागिने सुद्धा सोन्याचे पाणी चढवलेले ! आपल्याला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, ते सुद्धा कावळा बनल्यावर.... आपण सोने अगोदर पासून जमवायला हवे होते, तेव्हा जागेचे भाव सुद्धा फार नव्हते.

आणि मुलगी नको तर काय घराचा वंश वाढवायला मुलगा कोण जन्माला घालणार? आपण विज्ञानाचा पुरस्कार कधीच केला नाही.

महागाई, भ्रष्टाचार हे सर्व आपल्या डोळ्यादेखत मोठे झाले, पण आपण काहीच केले नाही, आपला कार्यभाग साधुन घेतला की झाले; हीच आपली वृत्ती!

तुमच्या घराला स्वतःचे घर समजून, सांभाळणारी मुलगी जेंव्हा लग्न होऊन येते तेंव्हा हुंडा का मागता? आणि तिला त्रास का देता? तुमच्या पोरात धमक नाही तिला सांभाळायची तर लग्न का केलं ? आणि म्हणे हुंडाबळी.

न्याय व्यवस्था आणि कायदा अजून इंग्रजांच्या काळातला आहे, तो बदलण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे होता.

सगळ्यांना ते तंतोतंत पटले, त्यांनी खंत व्यक्त केली.

तो सुज्ञ कावला म्हणालाअसो आता झाले ते झाले, आपण तर कावळे झालो, त्यांना जगू दे त्यांच्या प्रमाणे, फक्त छोटीशीच आशा बाळगू की, ही नवीन पिढी, योग्य वेळीच योग्य दिशेने विचार करेल.

आणि आता आपली निघायची वेळ झाली, या कावळ्याचा देह फक्त आजच्या दिवसापुरता मिळाला होता... तो सुज्ञ कावळा म्हणाला. थोड्या वेळात सगळे कावळे उडून गेले. आणि तो पिंपळ पुन्हा रिकामा झाला.

Sunday, 14 October 2012

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली.

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली. दिवसभर प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाने बऱ्याच कथा (Documentaries) दाखवल्या. त्या युद्धात आपण हरलो कारण कमी प्रतीची व जुनी हत्यारे वापरली गेली तसेच आपल्या संरक्षण मंत्रालयाची काही पावले चुकीची पडली.

विषय असा आहे त्या ५० वर्षानंतर जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारे आपण आज कुठे आहोत ?

त्या युद्धात सुद्धा आपले जवान शर्थीने लढले होते, आणि अजूनही आपल्या जवानांमध्ये ती देशभक्ती कायम आहे. फक्त वाईट एवढेच वाटते की शस्त्रे अजूनही आधुनिक नाहीत.
Short Range, Mid Range आणि Long Range अशा वेगवेगळ्या Assault  Rifles तसेच आधुनिक Bullet Proof Jackets आज आहेत पण आपल्या सुरक्षायंत्रणेकडे काहीच नाही. LOC वरचे जवान असोत किंवा मुंबई शहरात २४ तास ऑन ड्युटी असणारे पोलीस असोत. 

आपण अजूनही ठेच लागल्याशिवाय सुधारत नाहीत. आणि सुधारण्याची गती सुद्धा तितकीच वाखाणण्याजोगी... कारगिल युद्धात वापरलेल्या बोफोर्स तोफांचा खरेदी घोटाळा अजून सुटलाच नाहीये आणि रशियाच्या भंगारातून विकत घेतलेली आणि अंदाजे १२,००० करोड रुपये खर्चून आणि तीसुद्धा वेळेवर म्हणजेच २००९ सालात Commisson न केल्यामुळे रशियाला ५% म्हणजे ५०० करोड दंड आकारून, अजून "INS VIKRAMADITYA " (पूर्वश्रमीची Admiral Gorshkov )  १००% दुरुस्त करून आता आपल्याला २०१३ साली मिळणार आहे. आणि हा अजून एक संरक्षण महाघोटाळा बनून समोर येण्याची भीती वाटते.

आज चीन बंगालच्या उपसागरात पाय रोवतेय, अरबी समुद्रात तर त्यांच्या आण्विक पाणबुड्या ऑलरेडी फिरतायत आणि आता Aircraft Carriers त्यांच्या ताफ्यात भरती करण्याचा सपाटाच लावलाय.
आपल्या नंतर चीन ने रशियाला order देऊन त्यांची Aircraft Carrier Commisson करून घेतली, आणि आपण अजून वाटच पाहत बसलोय.

एक काय ते "Brahmos Atomic Capable Long Range Ballistic Missile"  बनवल्यामुळे म्हणे चीन च्या पोटात गोळा आलाय. एवढ्यावरच खुश आहोत आपण.
अमेरिकेबरोबर केलेला JAF - F35 चा करार पूर्णत्वास यायला अजून बराच वेळ आहे. एकाच "INS AARIHANT " बनवली आहे, आणि तिचा उदो उदो करत बसलोय..

गेल्या काही वर्षापूर्वी बातमी वाचली होती की, IAF ची एक Secret File गटारात सापडली होती. Secret Documents किती सुरक्षित आहेत तो वेगळा मुद्धा,पण आपण World War ३(Cyber War ) जे ऑलरेडी चालू झाले आहे, त्यात आपण सुद्धा ओढले जातोय. चीनी आपल्या कितीतरी Web Sites Hack करतायत, आणि या चीनी hackers नी संपूर्ण जगभर दहशत निर्माण केली आहे. 
भारतात ३G आणि ४ G तंत्रज्ञान आले आहे, WiFi  Hub बनू पाहणाऱ्या मुंबई-पुणे-बंगलोर-चेन्नई अशा शहरात किती Network सुरक्षित आहे कोण जाणे? मोबाईल वर सगळी कामे करणारी हाय टेक पिढी या सर्व धोक्यापासून खूप अनभिज्ञ आहे.

इतके सर्व असून आपण फक्त, महागाई- घोटाळे-लैंगिक अत्याचार- आतंकवाद - स्त्री भ्रूण हत्या- भ्रष्टचार - बेरोजगारी-शेतकरी आत्महत्या- रिसेशन - संसाराचे गाडे - चूल-मुल - बायको -घर- प्रेयसी- मित्र - पार्टी हेच करतोय .

आपण तिरंग्यातले ते तीन रंग- ते अशोक चक्र तो सम्राट अशोक, शिवाजी महाराजांनी रुजवलेली गानिमिकावे- भारताचे पहिले आरमार- आणि बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते, हे सर्व आपण विसरलोय का ?