काल दुपारी २६/११ च्या स्मारकाचा फोटो काढायला गेलो होतो. तीन AK-४७ सज्ज पोलीस हवालदार तिकडे उभे होते. त्यांना विचारून स्मारकाचा फोटो काढला. मला थोडा अजून क्लोजप फ्रेम फोटो हवा होता, त्या मुळे मी त्यांना विचारून थोडा जवळ गेलो आणि लेन्स फोकस केली; तसं त्यांच्यामधल्या एकाने विचारले झूम लेन्स नाही का ? मी म्हणालो सध्या एकच आहे.
पण तिकडून निघताना मला तो प्रश्न एका वेगळ्याच वैचारिक View Finder मध्ये घेऊन गेला.... त्या पोलिसांना कदाचित असे म्हणायचे होते का ? की आमची ड्युटी आणि कर्तव्य पाहतांना थोडं आमच्या परिस्थितीकडे ZOOM करून पहा.. २४ -२४ तास ड्युटी, मानसिक अशांतता, बदल्या अशा अनेक गोष्टीमधून स्वताला सावरत असताना चिरीमिरी घेऊन घर चालवणारा आणि तरीही मुंबईचे जीवन दिवसरात्र सुरक्षित ठेवणारा तो पोलीस कोण तर पांडू ?
४ वर्षापूर्वी जो अतिरेकी उच्छाद मांडला गेला होता त्या वेळी हा पांडूच त्याचा दांडू घेऊन धावला होता . कसाबला पकडल्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चा आणि प्रतीचर्चा सगळ्यांचे फड रंगले होते. आता "फड " शब्द मुद्दामून वापरला कारण या सर्व गोष्टी म्हणजे TRP कमवायचा तमाशाच. दर वर्षी २६ /११ जवळ आली की, चर्चा रंगणार. आता कसाबला फाशी दिल्यावर पुन्हा चर्चा सरकारचे कौतुक करायचे की उशीरा शिक्षा दिली म्हणून सुस्कार सोडत बोटं मोडायची. आपल्याला फक्त स्मारक बांधायचा छंद. शहिदांची कुटुंब राहिली बाजूला. फायर ब्रिगेडच्या जवानांना पदके आणि बक्षिसे जाहीर केली होती पण परवाच TV वर दाखवलं की अजून लाल फीत काही सुटली नाही.
काल रविवारी पाणी कपात म्हणून मुंबईकर रविवारी सकाळी लवकर उठले होते आणि दुपारी आणि संध्याकाळी आराम करत होते, पण कोणाला माहित २६/११ च्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि गुप्तहेर खाते युद्धपातळीवर काम करत होते. पण पण पडद्यामागचे कलाकार कॅमेरा समोर कधी येत नाहीत.
खरे तर बाळासाहेब गेल्यावर ऐन दिवाळीत शोकसागरात बुडालेल्या मुंबईने काल रविवारी तुलसीविवाहानिमित्त कंदील आणि पुन्हा रोषणाई केली होती. पण ज्या कुटुंबीयांनी २६/११ भोगले होते ते काय करत असतील ??
एकूण काय तर आपले आयुष्य DSLR आहे जणू पण कॅमेराच्या केस मध्ये वेगवेळ्या लेन्स बरोबर ठेवाव्यात आणि योग्य वेळी योग्य लेन्स लावली तरच तो फोटो योग्य Angle मध्ये आणि परफेक्ट Exposure मिळते . फक्त मुद्दा एकाच उरतो तो फोटोग्राफर कोण आहे?